पाटस प्रतिनिधी / योगेश राऊत
पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापुरवरून प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. २६) पहाटे हा अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सत्यभामा शिवराव बोयने व श्वेता प्रभू पंचाक्षरी दोघी रा. औरात शहाजनी (ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशी महिलेची नावे आहेत. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची माहिती घेऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे सोलापूरवरून खासगी लक्झरी बस ३० ते ४० प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पाटस घाटाच्या पायथ्याशी महामार्गावर रस्त्याच्या कडेला टायर फुटल्याने उभ्या असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, श्रीहरी पानसरे, रोहीदास जाधव, रविंद्र ठाकुर तसेच पाटस टोल नाका कंपनीचे व राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक सुरक्षा पथकाने धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करत पोलिसांनी काहीच वेळात वाहतूक सुरळीत केली. पाटस पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.