दौंड : ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्याच्या विलगीकरणासाठी दौंड नगरपरिषदेने उपयोगकर्ता शुल्काची अंमलबजावणी सुरु केली आहे.मालमत्ताकराच्या बिलाव्दारे याची वसुली होणार आहे.दौंड नगरपालिकेने सन २०२३-२४ पासून घरपट्टी आकारणी शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.उपयोगकर्ता शुल्क दुकानदारांना ५४० रुपये व घरगुती ३६० रुपये हा वेगळा कर आकारला जात आहे.वाढीव दरवाढीला आम आदमी पार्टीने विरोध केला होता.मात्र,त्यावेळी लोकप्रतिनिधी गप्प राहिले म्हणून दरवाढ रद्द झाली नाही,असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. भोर,सासवड,पंढरपूर, तळेगाव दाभाडे इत्यादी नगरपालिकेची दरवाढ रद्द झाली.तसेच पुणे,पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिकेची दरवाढ रद्द झाली. मात्र,दौंड नगरपालिकेकडून वाढीव दरवाढ करण्यात आली.दरवाढ ही पुढील पाच वर्षांसाठी कायम असते.पण आता नव्याने सन २०२४-२५ साठीच्या घरपट्टी आकारणी बिले नागरिकांना वाटप चालू आहे.यामध्ये उपयोगकर्ता शुल्क दुकानदारांना ५६७ रुपये व घरगुती ३७८ रुपये अशा प्रकारे दुकानदारांना २७ रुपये व घरगुतीमध्ये १८ रुपये वाढ करून पुन्हा वाढीव शुल्क आकारले आहे.नियमानुसार दरवर्षी दरवाढ करता येत नाही.मात्र,दौंड नगरपालिकेकडून सर्व नियम धाब्यावर बसवून नगरपालिकेचा भोंगळ कारभार चालू आहे.वाढीव उपयोगकर्ता शुल्क संदर्भात आम आदमी पार्टीचे दौंड तालुका संयोजक रवींद्र जाधव यांनी दौंड नगरपालिका प्रशासनाला जाब विचारणा केली असता.नगरपालिका प्रशासनाचे अजब उत्तर ते म्हणतात ‘प्रिंट मिस्टेक’ असू शकते.दौंड नगरपालिकेकडून दौंडकरांची घोर फसवणूक म्हणावी कि क्रूर चेष्टा.बेकायदेशीर वाढीव उपयोगकर्ता शुल्क संदर्भात आम आदमी पार्टीकडून नगरपालिका विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.