दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी / सुरेश बागल
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी, महाराष्ट्रात देखील हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी द्यावी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत इत्यादि मागण्या करिता “सरकार जगाओ” आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा (संलग्न भारतीय मजदूर संघ) तर्फे मा.ज्योती कदम निवासी जिल्हाधिकारी पुणे यांना भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष.मा अर्जुन चव्हाण, पुणे झोन अध्यक्ष, सुमित कांबळे, पुणे झोन सचिव निखिल टेकवडे, चंद्रकांत नागरगोजे , राहूल बोडके, उमेश आणेराव , यांनी मार्गदर्शन केले व शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.
राज्यभर कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांच्या मार्फत होत असलेले आर्थिक शोषण व त्यास अधिकाऱ्यांचे अभय व संगनमत असल्याने कष्टकरी कामगाराला पूर्ण वेतन मिळत नाही, बोनस नाही, पेमेंट स्लीप नाही, डोक्यावर सतत रोजगाराची टांगती तलवार, जीव कधी जाईल सांगता येत नाही अपघात झाल्यास विमा नाही या बिकट अवस्थेत कामगार वर्षानुवर्षे सेवा देत आहे.
यांच्या वेतनात वाढ करून हरियाणा सरकार प्रमाणे मध्यस्थी कंत्राटदारांना बाजूला सारून उपकंपनी तर्फे थेट कामगारांच्या बँक खात्यात वेतन देऊ असे आश्वासन डिसेंबर २०२३ नागपूर अधिवेशनात ऊर्जामंत्री फडणवीसांनी देऊन सुद्धा त्याची पूर्तता न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी आहे.
कंत्राटदार तुपाशी व कामगार उपाशी अशी वेळ आल्याने तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान ९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन करणार आहे. आज विविध जिल्हा मधील मा जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे .
अवर प्रधान सचिव ऊर्जा व कामगार यांनी मीटिंग घेऊन तोडगा काढावा ऊर्जामंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी अपेक्षा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली.