दौंड : दौंड शहरामध्ये पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.दौंड शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक,वाहनचालक, व्यावसायिक सगळेच प्रचंड वैतागलेले आहेत.अष्टविनायक महामार्गावरील सिध्दार्थ नगर, महात्मा जोतिबा फुले चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,धर्मवीर संभाजी महाराज चौक अशा प्रत्येक मुख्य चौकातील रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे दौंड शहरातील नागरिकांसह सिद्धटेक च्या गणपतीला येणारे भाविक वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत.आधिच भटक्या कुत्र्यांचा ताप त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पूढे येत आहे.मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात.बहुतांश मुख्य रस्ते,चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडवलेला असतो.दौंड शहरातील मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव बघता दौंड नगरपरिषदेने केंद्र व राज्यशासनाच्या कायदे पशू क्रूरता नियम व अधिनियम 1960,मुंबई पोलीस कायदा 1951 अंतर्गत जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे तसेच बेवारस जनावरांची गो-शाळेत रवानगी करावी अशी मागणी दौंड शहरातील नागरिक करीत आहे.